ज्ञानमहर्षी लोकमान्यांचे पुस्तकावलोकन   

शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

आज २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन. त्यानिमित्त लोकमान्य टिळकांच्या ग्रंथप्रेमाविषयीचा हा लेख.लोकमान्य टिळकांच्या करारी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू म्हणजे त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय अर्थात पुस्तक संग्रह. पुस्तकं हे लोकमान्य टिळकांचे मुख्य स्नेही. टिळकांचे वाचन अफाट होते. संस्कृत, गणित, खगोलशास्त्र, राष्ट्रीय परंपरा आदींमध्ये टिळक रममाण होत असत. बुद्धी ज्या विषयाकडे वळवायची तो विषय समूळ हस्तगत करावयाचा या उद्देशाने टिळकांचे अध्ययन चाले. आपल्या बुद्धीच्या कक्षेत विविध विषय यावेत, अशीही टिळकांची धडपड असे.
 
टिळकांची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी होती, केवळ मार्क मिळवण्यासाठी अभ्यास त्यांना आवडत नसे. जो विषय समोर असेल त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पाठ्यपुस्तकांखेरीज इतर सर्व संबंधित पुस्तके ते वाचून काढीत असत. मेरी व एलिझाबेथच्या इतिहासाचे पाठ्यपुस्तक बाजूला ठेवून त्यांनी इतर पुस्तकांच्या सहाय्याने स्वतंत्र टिपणी लिहून काढली होती. १८७२ मध्ये वडील मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या इच्छेनुसार भगवद्गीता ग्रंथावरील ’भाषा-विवृत्ती’ नावाची प्राकृत टीका वाचत असतांना, गीतेचे अंतिम तात्पर्य काय असेल हा प्रश्‍न प्रथम त्यांना भेडसावू लागला. कॉलेजात राहून दोन वर्षे विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ’निबंधमाले’चे वाचन करून त्यांनी आपल्या उपजत कर्तृत्वाला जी दिशा लावून घेतली व जी भावना जोडून दिली ती शिदोरी त्यांना संपूर्ण आयुष्य पुरी पडली. लोकमान्य टिळक, आंदोलनात्मक कार्याबरोबरच रचनात्मक कार्याचे महत्व जाणून होते. ’ओरायन’ हा पहिला ग्रंथ लिहितांना, आपल्या संशोधनाला बळकटी यावी म्हणून लोकमान्य टिळकांनी संहिता, उपनिषदे, आश्‍वलायन, आपस्तंबादी, श्रौत-गुह्य सूत्रे, स्मृती, दर्शनांपैकी पूर्वमीमांसासूत्रे, त्यांच्यावरील भाष्य व टीका,  संस्कृत अमरकोश, पाणिनीचे व्याकरण, एवढेच नव्हे तर वैदिक ग्रंथदेखील त्यांच्या संशोधनातून सुटले नाहीत. ’ओरायन’ हे पुस्तक पाहावे, तर लहान आकाराच्या जेमतेम अडीचशे पानांचे; परंतु त्याकरिता त्यांना इतर ग्रंथांची अंदाजे कमीत कमी पंचवीस हजार पाने तरी चाळावी किंवा अभ्यासावी लागली असे नि:शंकपणे म्हणता येईल’.
 
लोकमान्य टिळकांचा राजद्रोहाचा पहिला खटला मराठी भाषेवर आधारित होता, त्यासाठी ’बालबोध मासिक’, ’पुष्पवाटिका’ नावाचा कवितासंग्रह, महाभारत, मॅक्समुल्लर यांचे संस्कृतच्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेले वाचनपाठाचे पुस्तक, जोशी-गोडबोले आणि दादोबा यांची व्याकरणे, 1829 चा शस्त्रीमंडळींचा मराठी-मराठी कोश, मोलशवोर्थ यांचा मराठी-इंग्रजी कोश, कँडीचा इंग्रजी-मराठी कोश, मराठी शाळेत शिकविले जाणारे पाचवे क्रमिक पुस्तक, मनुस्मृती, हितोपदेश अशा कितीतरी लहानमोठ्या पुस्तकांचा बचावासाठी वापर केला गेला. पृथक्करण, हा टिळकांच्या बुद्धीचा विशेष गुण. एकदा विषय पुढे येताच त्याची भिन्न भिन्न अंगोपांगे आधी पाहायची. त्या योगाने त्याच्या घडणीचा क्रम स्पष्ट उलगडून बुद्धीत कसलाही भ्रम शिल्लक ठेवायचा नाही ही टिळकांची सवय होती.
 
राजद्रोहाच्या पहिल्या शिक्षेत, तुरुंगात वाचण्यासाठी टिळकांना ऋग्वेद पाहिजे आहे अशी माहिती मॅक्समुल्लर महाशयांना कळल्यामुळे त्यांनी स्वतः प्रकाशित केलेल्या ऋग्वेदाची एक प्रत टिळकांसाठी पाठवून दिली. या वाचनाचा टिळकांच्या विचारांवर काय परिणाम झाला हे सुटकेनंतर लवकरच प्रसिद्ध झालेल्या टिळकांच्या एका मुलाखतीतून दिसून येते. लोकमान्य टिळकांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ म्हणजे ’आर्क्टिक’. राजद्रोहाची पहिली शिक्षा भोगत असताना, लोकमान्य टिळक ऋग्वेदाचा अभ्यास करत होते. आर्यांचा मूळ ग्रंथ वेद आणि इराणी मूळग्रंथ ’अवेस्ता’ यांचाही टिळकांनी विवेचनासाठी मुख्य आधार घेतला आहे.
 
१९०७ मध्ये फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ’कीचकवध’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्या मागोमाग अवघ्या अडीच महिन्यात (मे महिन्याच्या चौदा तारखेला) ’बायकांचे बंड’चा पहिला प्रयोग झाला. या नाटकाच्या प्रयोगाला खुद्द लोकमान्य टिळक येऊन बसले. त्यांनी पूर्ण नाटक पाहिले. त्यांनी कृ.प्र. खाडिलकरांना बाजूला घेऊन सांगितले की, ’या नाटकाला तुम्ही प्रस्तावना लिहा. त्यासाठी ’रॉयल एशियाटिक सोसायटी’मध्ये असलेल्या ’सेक्स अँड कॅरेक्टर’ या पुस्तकाचा आधार घ्या!!!’
 
ज्ञानउपासना
 
राजद्रोहाच्या दुसर्‍या शिक्षेत, लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी मंडालेच्या कारागृहात करण्यात आली. राजकीय ग्रंथ नाही, वृत्तपत्र नाही, फक्त धार्मिक ग्रंथ तेवढे मिळाले. ते ग्रंथ लोकमान्य टिळकांना त्या एकांतवासात ’जादूच्या दिव्या’प्रमाणे उपयोगी पडले. या एकांतवासाचा उपयोग त्यांनी ’ज्ञान-उपासने’साठी केला. मंडाले येथे त्यांना वाटतील तेवढी पुस्तके ठेवण्याची मुभा मिळताच लोकमान्य टिळकांनी १९०८ च्या नोव्हेंबरपासून पुणा, मुंबई आणि विलायतेतून पुस्तके मागवण्याचा सपाट लावला. त्यांनी तब्बल ४०० पुस्तक मंडाले कारागृहात अभ्यासासाठी मागवून घेतली. राजद्रोहाची दुसरी शिक्षा भोगत असताना, लोकमान्यांकडून जी पुस्तके पुण्याहून मागवण्यात येत असत, ती कोणत्या दालनात, कोणत्या कपाटात, कोणत्या कप्प्यात किंवा अगदी कोणत्या गाठोड्यात सापडतील, याचीही माहिती त्यांच्या पत्रव्यवहारात आढळते. एखाद्या पुस्तकातल्या कोणत्या पानावर कोणता उतारा आहे आणि तो आपल्याला का हवा आहे, याची माहिती ते पत्रातून देत असत. मंडाले तुरुंगातून शनिवार दिनांक ०२ जुलै १९१० रोजी धोंडोपंत विद्वंस यांना लिहिलेल्या पत्रात ते पुस्तकांबद्दल लिहितात - वेबरच्या नक्षत्राच्या दोन प्रती आपल्या संग्रही होत्या; पण तुम्हाला एकही प्रत सापडली नाही हे कसे? तरी मोठ्या दालनातील पूर्वेकडील भिंतीशी टेकून ठेवलेल्या तीनही कपाटात आणि मधोमध ठेवलेल्या दोन शिसवी कपाटात नीट शोधा. 
 
लोकमान्य टिळकांच्या जीवनातील कळसाध्याय म्हणजे, मंडाले तुरुंगात ’गीता-रहस्य’ ग्रंथाची निर्मिती. सिद्धावस्थेतील पुरुषानेही व्यवहार कसा करावा याचे जे शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध विवेचन टिळकांनी गीतारहस्यात केलेले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंबित झालेले आढळून येते. ’वेदांग ज्योतिष’ आणि ’गीतारहस्य’ लिहिण्यासाठी मागवलेल्या पुस्तकांची यादीच शेकडो पुस्तकांची होती.  ’गीता-रहस्य’ ग्रंथाच्या शेवटी, लोकमान्य टिळकांनी संदर्भ सूची दिली आहे. या सूचीमध्ये, २०६ संस्कृत ग्रंथ आणि ७३ पाश्‍चात्य ग्रंथ नमूद केले आहेत. शिवाय १०९ व्यक्‍तींची ग्रंथांतर्गत उल्लेखाबद्दल सुद्धा सूची आहे.
 
पत्रकारितेची पुस्तके
 
लोकमान्य टिळक पराकाष्ठेचे विद्याव्यासंगी म्हणून त्यांनी जो पुस्तकसंग्रह चालविला होता, त्यामध्ये वृत्तपत्रकारितेसाठी अवश्य असलेल्या पुस्तकांचीही भर पडत असल्याने ती सुद्धा ’केसरी’चा एक स्वतंत्र शाखासंस्थाच होती. त्यामध्ये अनेक विषयांची इंग्रजी, मराठी, संस्कृत, किंबहुना जर्मन व फ्रेंच भाषांचीसुद्धा पुस्तके विषयवारीने निरनिराळ्या कपाटांतून भरून ठेवलेली होती. या संग्रहात टिळकांनी खरेदी केलेल्यांखेरीज लोकहितवादी, प्रो. जिनसीवाले, सोहनी अशा आणखी तिघांकडील पुस्तकांचा संग्रह असून टिळकांच्या हयातीमध्ये तोही वेगवेगळ्या खोल्यांतून ठेवलेला होता. वाङ्मय, शास्त्र, कायदा, मराठीतील जुनी-नवी पुस्तके वगैरे सर्व प्रकारचे विपुल साहित्य टिळकांच्या संग्रहात होते व त्याच्यावर खुद्द टिळकांचीच कडक देखरेख असल्याने त्यांत फेरफार करण्याची कुणाला कधीच संधी मिळत नसे. एखाद्याने मागितलेले पुस्तक, संग्रहात असेल तर टिळक तत्काळ उठून स्वतःच हवे असलेले पुस्तक मागणार्‍याला आणून देत. याप्रमाणे एखाद्या वेळी दिवसातून अनेकदा पुस्तकासाठी कपाटाकडे जा-ये करावी लागली तरी त्यांना या बाबतीत कंटाळा येत नसे.
 
पुण्यातील पुस्तकसंग्रह हा त्यांच्या जिव्हाळ्याचा एक स्वतंत्र विषय होता. टिळकांचा ग्रंथसंग्रह तिघाजणांचा होता. त्यांपैकी एक त्यांचा स्वतःचाच होता. दुसरा गोपाळराव देशमुख अर्थात ’लोकहितवादीं’चा, तर तिसरा प्रो. जिनसीवाल्यांचा होता; पण गोपाळरावांच्या वा जिनसीवाल्यांच्या संग्रहात कोणते पुस्तक सापडेल हेसुद्धा ते तुरुंगातून कळवीत. तेथून पुस्तके मागवावी व त्यातले एखादे पुस्तक अपेक्षित काळात हाती न आले तर ते पुस्तक कोणी पळवले की काय आणि पळवले असेल तर अशीच इतर काही पुस्तके एक-एक याप्रमाणे हळूहळू गहाळ होत असतील या विचाराने त्यांच मन व्याकुळ होत. ’पुस्तकांना जपा, ती ’केसरी-मराठा’ पत्रांच्या संबंधितांखेरीज इतर कुणालाही देऊ नका’ अशा प्रकारची भाषा त्यांनी पत्रांतून वापरली आहे.
 
पुस्तक वाचण्याची त्यांची पद्धत इतरांहून वेगळी होती. त्यांच्या व्यासंगाच्या विषयाचे पुस्तक हाती पडले, की प्रथम त्याचा पाठपोट दर्शनी भाग पाहाण्याची त्यांची पद्धत होती. नंतर मधली काही पाने चाळीत. नंतर प्रकरणाचे मथळे पाहून ग्रंथकाराने ग्रंथसंगती कशी बसवली आहे ते पाहात. त्याच पुस्तकाच्या विषयाची आणखी काही पुस्तके छापलेली किंवा छापली जात असतील, तर प्रकाशक त्याची मागे जाहिरात देतो म्हणून त्यावर नजर ठेवण्याची टिळकांना सवय होती. 1908 मध्ये तुरुंगात जाण्यापूर्वी एका ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकामागे छापत आहे अशा आणखी एका पुस्तकाची जाहिरात त्यांच्या नजरेस आली. तुरुंगातून सुटून आल्यावर ’वैदिक क्रॉनॉलॉजी’च्या निमित्ताने एका तज्ज्ञाबरोबर ज्योतिषाची चर्चा चालू असता त्यांना त्या जाहिरातीची आठवण होऊन त्यांनी ते पहिले पुस्तक काढले. त्यातील ती जाहिरात दाखवून हे पुस्तक मधल्या सहा वर्षांच्या काळात छापून झाले असेल, तर ते मागविण्याचा विचार मांडला.
 
लोकमान्य टिळक वाचलेल्या पुस्तकांत लाल-निळ्या पेन्सिलींच्या खुणा करीत असतील व त्या योगाने त्यांना शंकेच्या समाधानाची स्थळे झटकन सापडत असावी, यासारखा तर्क करता येईल; पण तोही खरा ठरणार नाही. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांतील अगदी थोड्या पुस्तकांत खुणा आढळत असत. महाभारत हा टिळकांच्या अतिप्रेमाचा ग्रंथ. इतर काही तात्कालिक महत्वाचे पुस्तक वाचायचे नसेल व फुरसत असेल तर ते महाभारत वाचायला घेत. हा ग्रंथ कुठेही उघडावा आणि वाचावा; त्यात मन तर रमतेच, पण काही ना काही त्यात नवेही सापडते, असा तो ग्रंथ आहे. माणसाच्या आवडीचा एखादा ग्रंथ किंवा विषय असावा; इतर कामांच्या धकाधकीत बुद्धी शिणल्यास तिला तरतरी आणण्याला असा ग्रंथ व विषय उपयोगी पडतो, असे टिळक नेहमी म्हणत.
 
एखाद्या विषयात खोल शिरायचे असेल तर त्या विषयाच्या तात्त्विक चर्चेची पुस्तके ते आपले ग्रंथसंग्राहक विद्वान स्नेही, पुण्यातील फर्ग्युसन व डेक्‍कन ही महाविद्यालये व आनंदाश्रम यांची ग्रंथालये व तेवढ्याने न भागल्यास मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे संग्रहालय यांच्याकडून मिळवीत आणि मग अभ्यासपूर्वक आपले विचार लोकांपुढे ठेवीत. पुष्कळदा ते ’केसरी’च्या लेखांसाठी टीपणेही काढीत. लेख सांगताना आवश्यक वाटणारी पुस्तके व नियतकालिके जवळ ठेवीत. एखादा संदर्भ पटकन सापडला नाही, तर त्यासाठी लेख थांबवून त्या संदर्भाच्या शोधात वेळ काढून संबंधित पुस्तक वाचीत.लोकमान्य टिळकांनी, ज्ञानार्जनाची आवड राष्ट्रकार्यासाठी दडपून टाकली. राष्ट्रमातेच्या चरणी त्यांनी केलेल्या विविध त्यागात हा त्याग सर्वोत्तम होता. आपल्या आयुष्यातील व्यापात व आघातात त्यांनी जो विद्याव्यासंग चालवला, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.

Related Articles